अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोठेवाडी प्रकरणात मोक्का अंतर्गत औरंगाबाद येथील हर्सूल तुरूंगात काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या हाब्या पानमळ्या भोसले (वय 55) याच्या तीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) येथील दरोडा व अत्याचार प्रकरणातील 12 आरोपीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
यातील एक आरोपी हाब्या भोसले हा औरंगाबाद येथील तुरूंगात असताना मागील माहिन्यात त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान हाब्या भोसले याचे तीन मुले एलसीबीने चोर्या, घरफोड्या गुन्ह्यात अटक केली आहेत.
त्यांच्यासह त्यांचा एक नातेवाईकासही पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील पत्रपरिषदेत माहिती देणार आहेत.
अटक केलेल्या आरोपींकडून सुमारे 42 तोळे सोन्याचे दागिणे जप्त केले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. नगर जिल्ह्यातील अनेक घरफोडी, चोरीचे गुन्हे यामुळे उघडकीस आले आहेत.