आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाला बरोबर घ्यायचे नाही; पालकमंत्री मुश्रीफ यांच्या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  आगामी नगरपालिका निवडणूक स्व बळावर की महाविकास आघाडी करून लढायची याचा निर्णय स्थानिक पातळीवर आमदार, पक्ष पदाधिकारी यांनी घ्यावा.

कोणत्याही परिस्थितीत भाजपाला बरोबर घेऊन निवडणूक लढायची नसल्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षाच्या आयोजित आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या.

पालकमंत्री मुश्रीफ मंगळवारी जिल्हा दौर्‍यावर होते. त्यांनी राष्ट्रवादी भवनात पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. जिल्ह्यातील 10 नगरपालिकेच्या निवडणूका होत आहेत.

त्यादृष्टीकोनातून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राजश्री घुले, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला अध्यक्ष मंजुषा गुंड, युवकचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे,

संजय कोळगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, येत्या काही दिवसांत होवू घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्यास ते जास्त धोक्याचे आहे.

लोकांच्या वैयक्तीक कामे करण्याकडे लक्ष केंद्रीत केल्यास त्याचा निवडणूकीत फायदा होतो. विकास कामे किती केली, तरी मते मिळतीलच यावर माझा विश्‍वास नाही, त्यामुळे जास्तीत जास्त वैयक्तीक कामे करण्यावर यापुढे पक्षाचा भर असणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंंकराने भाजपवर तिसरा डोळा उघडावा, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष फाळके यांनी जिल्ह्यातील कोपरगाव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, राहुरी, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, संगमनेर या होऊ घातलेल्या 10 नगरपालिकेच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली.