अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- केडगाव येथे नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या पी.एच. इन्व्हरमेंटल सोल्युशन कंपनीच्या कार्यालयाला गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.
महापालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. केडगावमध्ये नगर-पुणे महामार्गावर असलेल्या जुन्या टोयाटो शो-रुमजवळ पी.एच. इन्व्हरमेंटल सोल्युशन कंपनीचे कार्यालय आहे.
दुपारच्या सुमारास या कार्यालयास शॉर्टसर्कींटने अचानक आग लागली. या आगीची माहिती तातडीने महापालिकेच्या अग्नीशामक दलाला तसेच कोतवाली पोलिसांना कळविण्यात आली.
अग्नीशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. कोतवालीचे साहायक पोलिस निरीक्षक विवेक पवार, उपनिरीक्षक मनोज महाजन हेही पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.
आग लवकर आटोक्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या आगीत कंपनीच्या कार्यालयातील विविध साहित्याचे नुकसान झाले आहे.
केडगावचे मंडलाधिकारी व तलाठी यांनीही घटनास्थळी जावून आगीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.