नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (five states assembly election result) काल (१०मार्च २०२२) ला जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने (Bjp) चार राज्यांत आपली सत्ता राखली आहे.
तर पंजाबमध्ये (Panjab) आपचा झाडू चालला आहे. परंतु या पाच राज्यामधील एकाही राज्यात काँग्रेसला (Congress) सत्ता मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये याबाबत नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे या पराभवानंतर काँग्रेसमध्ये मंथन केले जाणार आहे. यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. अध्यक्ष निवडण्याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांच्या घरी आज किंवा उद्या काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. पाच राज्यात पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस तातडीची बैठक घेत असून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेस अध्यक्षाची निवड करणार असल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी आले होते. मात्र त्याआधीच विधानसभा निवडणुकांच्या निकालात मोठा धक्का बसलेल्या काँग्रेसला सक्रिय अध्यक्षांची गरज भासत असल्याचं दिसते आहे.
तसेच मध्यंतरी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा होती, मात्र लोकसभा निवडणुकांमधील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र आता पुन्हा राहुल गांधींच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली जाणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.