लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निकालानंतर (Uttar Pradesh Assembly Result) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यपाल (Governor) आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
यानंतर लवकरच ते यूपीमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावाही करू शकतात. तसेच राज्यपालांची भेट घेतल्यानंतर योगी थेट राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

भाजप (Bjp) आघाडीला पूर्ण बहुमत
उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या ४०३ जागांपैकी भाजप युतीने २७३ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहर विधानसभेची जागा एक लाखाहून अधिक मतांनी जिंकली आहे.
मात्र, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा कौशांबी जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघात सात हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. प्रमुख विरोधी पक्ष सपाने १११ जागा जिंकल्या आहेत.
सपाचा मित्रपक्ष आरएलडीने आठ तर सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने सहा जागा जिंकल्या आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार प्रोफेसर एसपी सिंह बघेल यांचा ६७ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी आणि योगी आदित्यनाथ यांचा निवासस्थान आणि गोरखपूर मतदारसंघात भाजपला एकतर्फी यश मिळाले आहे.