अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हर्षल दीपक काळभोर (रा. बुरूडगाव रोड, नगर) याला अटी व शर्तीवर जामीन दिला होता.
दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्तीचे त्याने उल्लंघन केले. ही बाब जिल्हा पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याचा जामीन अर्ज रद्द करत त्याला तात्काळ हजर राहण्याचे आदेश न्यायमूर्ती वि. भा. कंकणवाडी यांनी दिले आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भादंवि कलम 354, 327, 504 गुन्ह्यातील आरोपी हर्षल काळभोर याला कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर त्याने 2018 मध्ये खंडपीठात जामीन मिळावा याकरता अर्ज केला होता.
न्यायालयाने त्या वेळेला त्याला जामीन देताना सदरचा गुन्हा हा न्यायप्रविष्ट आहे, तोपर्यंत त्याने नगर शहरामध्ये यायचे नाही, फिर्यादी व साक्षीदार यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क करायचा नाही.
तसेच त्याने परत कुठलाही गुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यायची, असे आदेश दिले होते. दरम्यानच्या काळात त्याने चार दखलपात्र व तीन अदखलपात्र गुन्हे केले होते.
संबंधित आरोपीने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची बाब पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या लक्षात आली. आरोपीने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याचा जामीन अर्ज रद्द करावा, असा अर्ज खंडपीठात दाखल केला होता.
त्या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने यावेळी पोलिसांनी दिलेला अर्ज व त्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत संबंधित आरोपी काळभोर याला कारागृहामध्ये हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
जर संबंधित आरोपी तेथे हजर झाला नाही तर पुढील कारवाई करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिलेले आहेत.