अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- न्यायालयात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणार्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश श्रीमती बी. एस. गोरे यांनी दोषी धरून एक वर्ष साधी कैद व तीन हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
प्रमोद ऊर्फ भावड्या दादु पगारे (रा. सिव्हील हाडको, अहमदनगर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकिल मोहन पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. 30 जून, 2015 रोजी पोलीस नाईक प्रमिला गायकवाड या नगर न्यायालयात ड्यूटीवर होत्या.
तेथे दुपारी 12 वाजेच्या सुमारास गर्दी जमल्याने महिला सहायक फौजदार कल्पना केदारे तेथे गेल्या. त्या गर्दी पांगवित असताना गायकवाड देखील तेथे आल्या.
त्यावेळी सबजेलमधून आणलेल्या तीन आरोपींपैकी एकाने गायकवाड यांना मारहाण केली व इतर दोघांनी त्यांना ढकलुन देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता.
याप्रकरणी आरोपींविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार बी. एच. धनगर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदरच्या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सर्व महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्यधरून आरोपी पगारे याला शिक्षा ठोठावली आहे.