अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे बिबट्याचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. यातच वनविभाग परिसरात पिंजरा बसविण्यात चालढकल करत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील खडकेवाके येथे मुजमुले वस्ती, यादव, सुरासे वस्ती तर कधी चिकने वस्ती या भागात बाहुतांशी शेतकर्यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.

मुजमुले वस्तीवर विटभट्टीवर कामगाराच्या मुलांवर बिबट्या झेप घेणार त्यावेळी कामगारांनी मोठमोठ्याने आवाज दिल्याने बिबट्याने काढता पाय घेतला.
यावेळी मुजमुले वस्तीवरील शेतकर्यांनी फटाके वाजवून त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. दुसर्या दिवशीही ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.
वन विभाग अधिकार्यांनी स्वतः येऊन घटनेची पाहणी केली. तसेच बिबट्याचे ठसे असल्याची खात्री झाली व लगेचच पिंजरा लावू, असे सांगून निघुन गेले.
मात्र अद्यापपर्यंत वन विभागाने पिंजरा न लावल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट तयार झाली आहे. वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.