मुलीचा विवाह झाल्याचे नातलगांना कळाले अन्

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar News :- नगरजवळच्या निंबोडी येथून ऊस तोडणीच्या कामासाठी कुटुंबासह कर्जत तालुक्यात गेलेल्या कुटुंबाने तेथेच मुलीसाठी सोयरिक जुळविली.

एका युवकाशी विवाहही लावून दिला. मात्र, ही गोष्ट गावाकडील नातलगांना कळाली आणि मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

त्यानंतर मुलीचे वडील, पती आणि सासऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विवाह झाल्यानंतर अडीच महिन्यांनी ही कारवाई झाली.

त्यामुळे बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत झालेल्या यंत्रणाना चकवा देत असे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले.

नगर शहराजवळील निंबोडी या गावातील शेतमजूर कृष्णा छगन साळुंखे ऊस तोडणीच्या कामासाठी कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथे गेले होते.

तेथे त्यांची ओळख अर्जुन गोरे यांच्यासोबत झाली. यातून तिथेच साळुंखे यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह जुळविण्यात आला. ७ जानेवारी २०२२ रोजी अल्पवयीन मुलगी आणि दादा अर्जुन गोरे यांचा विवाह तोरकडवाडी येथे गोरे यांच्या घरातच साध्या पद्धतीने लावून देण्यात आला.

काही काळाने ही घटना निंबोडी येथे साळुंखे यांच्या नातलगांना समजली. ज्या मुलीचा विवाह झाला, ती अल्पवयीन आहे. त्यामुळे नातलगांनी नगर शहरातील भिंगार कँप पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे पाठविले.

न्यायालयाने कायद्यातील तरतुदीनुसार कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथील ग्रामसेवकांना खातरजमा करून फिर्याद देण्याचा आदेश दिला.

त्यानुसार ग्रामसेवक जालिंदर गणपत पठाडे यांनी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये १७ मार्च २०२२ रोजी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा छगन साळुंखे (रा. निंबोडी), दादा अर्जुन गोरे, अर्जून गोरे (रा. तोरकडवाडी, ता. कर्जत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe