अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- बीजमाता म्हणून सर्वांना परिचित असलेल्या अकोले तालुक्यातील राहीबाई पोपेरे यांनी आपल्या कामाच्या जोरावर पद्म पुरस्कारापर्यंत मजल मारली.
त्यांच्याप्रमाणेच संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील हिराबाई नेहे काम सुरू आहे. त्यांच्या शेतात अलीकडेच सात किलो वजनाचे रताळे पिकल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ हे गाव पूर्वी रताळाचे सावरगाव म्हणून प्रसिद्ध होते. रतळ्यासाठी पोषक असलेली जमीन त्या गावात आहे.
नेहे यांनी ऑगस्ट महिन्यात कांद्याची लागवड केली होती. त्या शेताच्या बांधावर त्यांनी रताळ्याचा वेल लावला होता. अलीकडेच त्यांनी आपण लावलेल्या रताळ्याचा वेल काढला.
कोणत्याही प्रकारचे खत नाही, औषध नाही तरीही तब्बल सात किलोचे रताळे निघाले. पोपेरे यांच्याप्रमाणेच नेहे यांचे नैसर्गिक शेती आणि बियाणे बँकेचे काम आहे.
सेंद्रीय वाणांचे संवर्धन, प्रसार, आरोग्यदायी भाज्यांची लागवड यावर त्यांचा भर आहे. विविध प्रकारच्या पन्नास वाणांचे त्यांनी जतन केले आहे.
त्यांना रासायनिक खते, औषधे दिली जात नाहीत. बियाणांचे वाण संवर्धित करण्यासाठी वेगवेगळ्या खपराच्या मडक्यांत राख टाकून त्याचे बियाणे जतन करून ठेवतात.
हे बियाणे तीन ते चार वर्षे टिकते. जतन केलेले बियाणे आपल्या कुटुंबाबरोबरच परिसरातील इतर कुटुंबानाही अनेक वर्षांपासून गरजेनुसार मोफत वाटप करतात.
यासोबतच अनेक पारंपरिक ओव्या, गिते, जात्यावरील गाणी, तयार करण्याचा आणि गायनाचा त्यांचा छंद आहे.