अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्याच्या राजकारणात नात्यागोत्या पुढे राजकीय बंधने दुर्लक्षित होऊन चुकीच्या कामाबद्दल कोणी कुणाविरुद्ध बोलायला तयार नाहीत.
अशा निष्काळजीपणामुळे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून गरजूपर्यंत पोहोचत नाहीत, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

केंद्र शासनाच्या सहकार्यातून वयोश्री योजनेअंतर्गत एक हजार लाभार्थ्यांना दैनंदिन वापराचे आरोग्य साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शहराध्यक्ष अजय भंडारी, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड,
अॅड. प्रतीक खेडकर आदी उपस्थित होते. विखे यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले व मंत्री शंकरराव गडाख या दोन कुटुंबांमध्ये नव्याने नातेसंबंधानंतर निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीकडे कोणाचे नाव न घेता आमदारासह अन्य नेत्यांचे लक्ष वेधले.
खासदार विखे यांनी जिल्हा परिषदेतील टक्केवारी व कमिशन राजबद्दल जाहीर वक्तव्य करत शाळा खोल्यासाठी सुद्धा टक्केवारी देण्या-घेण्याचे प्रकार जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच घडल्याचे सांगितले.
खासदार विखे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाकडे जगाचे लक्ष लागले. सर्वसामान्य लोकांचा सुख-दुखांचा विचार करत मोदी यांनी वयोश्री योजनेच्या माध्यमातून दिलेला मदतीचा हात गरजू व्यक्ती कधीही विसरणार नाहीत.
देशामध्ये अशा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार नगर पॅटर्नची दखल घेतली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशात नगरचा बहुमान झाला. यामध्ये संपूर्ण टीमचे यश आहे. प्रास्ताविक अजय रक्ताटे यांनी केले. आभार माणिक खेडकर यांनी मानले.