Narayan Rane : नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा; म्हणाले, “आगे आगे देखो होता है क्या”

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांना ट्विट (Tweet) करत इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना ईडीने जोराचा झटका दिला आहे.

श्रीधर पाटणकर यांच्या ईडीने (ED) ठाण्यातील (Thane) ११ सदनिका जप्त केल्या आहेत. त्यामुळे नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशाराच दिला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

श्रीधर पाटणकर यांच्या ११ सदनिकांची आजची किंमत 6 कोटी 45 लाख असल्याची माहिती ईडीने दिली आहे. त्यामुळे श्रीधर पाटणकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याची दिसत आहे.

नारायण राणे यांनी काय ट्विट केले आहे?

आगे आगे देखिए होता है क्‍या! महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा.

सव्वा दोन वर्षांत महाराष्‍ट्राच्‍या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्‍यांच्‍या नशिबी आत्‍महत्‍या! आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली?

शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्‍ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच! असे ट्विट करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, थेट मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई झाली आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबलेत, त्यांनी राजीनामा द्यावा.

आतापर्यंत आम्ही सगळीकडे त्यांचं नाव ऐकत होतो. ते आता सिद्ध झालं आहे. तो पैसा काही त्यांच्या घरापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. ते भुयारी गटार थेट मातोश्रीपर्यंत जातं. त्यामुळे आता मातोश्रीने उत्तर द्यायला हवं, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावं.

सचिन वाझे आणि हे पैसे कुठे कुठे फिरत आहेत हे आता समोर आलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिक दृष्टीकोनातून राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.