अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :- यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक पिकांचे उत्पादन न घेता कडधान्य पिके घेण्यावर जास्त भर दिला आहे.तर ज्वारीचे उत्पादन घटले आसून ज्वारीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक असले तरी यंदा मात्र हरभरा आणि सोयाबीनने या पिकाची जागा घेतली आहे.सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा ही पीके काढणीला आलेली आहेत.
निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत रब्बी हंगामातील पिके काढण्याच्या अंतिम टप्प्यात आली असून ज्वारी पिकाची काढणी देखील सुरू झाली आहे.
यातच मजुरीच्या दरात वाढ आणि पावसाची धास्ती यामुळे शेतकरी कुटुंब रात्रीचा दिवस करुन शिवारात राबताना दिसत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या सुगीची लगबग सुरु झाली असून ढगाळ वातावरणाच्या सावटाखालीच ज्वारी पिकाची काढणी सुरु आहे.
पूर्वी ज्वारी ही उपटून काढली जात होती तर निसर्गाचा लहरीपणा पिकावर बेतू नये म्हणून आता ज्वारीची देखील कापणी होत आहे.
सध्या बाजारपेठेत ज्वारी 2 हजार 500 ते 3 हजार रुपये दर मिळत आहे.तर यंदा ज्वारीचे उत्पादन घटल्यामुळे अधिकचे दर मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
त्यामुळे शेतकरी काढणी झाली की लगेच पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करत आहेत. जे खरिप हंगामत झाले त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उत्पादनाची सुरक्षा ही महत्वाची आहे.
तर या बदललेल्या वातावरणामुळे ज्वारीची कणसे काळवंडण्याचा धोका असतो. त्यामुळे काढणी, मोडणी झाली की लागलीच मळणी कामे उरकून पीक पदरात पाडून घेण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांच्या कडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.