नागपूर : राज्यात महाविकास आघडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाया सुरु आहेत. त्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीतील वाद आता शिगेला पोहोचले आहेत. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले, रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्याची चर्चा जगभर सुरू आहे. आमच्या सारखे लोक सुद्धा रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीत बसलेत.

ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही.
आम्ही त्यातून वाचलोय असे म्हणत संजय राऊत यांनी दिल्लीतील पुतीन म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
पुन्हा येईन वाले संध्याकाळी इथे येणार आहेत. तेव्हीही मी येईल. बाजूला बसेल. पुढच्या वर्षी लोकमतच्या कार्यक्रमात येईल असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचं लक्ष नाही.
केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू आहे. काल पाटणकरांवर कारवाई केली. त्या कारवाई मागचं सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावं. हे नीट समजून घ्या. चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत.
हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील. ही आमच्याविरोधातील बदनामीची मोहीम आहे. हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही. मी पूर्ण विश्वासाने सांगतो आत्मविश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार आहे असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.