अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Ahmednagar News :-जिल्ह्यातील न्यायालयात तडतोड योग्य प्रकरण प्रलंबित असलेल्या पक्षकारांसाठी ७ मे ही महत्वाची तारीख आहे. जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये शनिवारी ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व सचिव रेवती देशपांडे यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार हा उपक्रम होत आहे. जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, विज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम ३२० नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्हयांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे तसेच बँक व मोटार विज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत.
तसेच महानगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुली प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे सहकार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण न्यायालय, कामगार न्यायालयातील पक्षकारांचे संबंधित खटलेही येथे ठेवण्यात येणार आहेत.