अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- ‘ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो. आणि आमच्यावर अन्याय झाला तर लगेच पलटी मारतो,’ असं बेधडक वक्तव्य नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं आहे.
श्रींगोदा तालुक्यातील बेलवंडी येथील सोसायटीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘ज्या पक्षाकडून न्याय मिळण्याची आशा वाटते, त्या पक्षात आम्ही जातो.

मात्र, तेथे अन्याय झाला तर आम्ही लगेच पलटी मारतो,’ विखे यांच्या पक्षांतराची नेहमी चर्चा होत असते. त्याला उत्तर म्हणून संधी मिळेल तेथे विखे पाटील आपली पक्षीय भूमिका मांडत असतात.
या कार्यक्रमाला भाजपचे श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी घनश्याम शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नहाटा, भाजपच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा पाचपुते असे सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी ही संधी साधून विखेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. विखे पाटील यांनी अलीकडेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी पूर्वीप्रमाणेच जिल्हा विकास आघाडी ही सर्वपक्षीय आघाडी करण्यासंबंधी भाष्य केलं होतं. त्याच्याशी या वक्तव्याचा संबंध जोडला जाऊ लागला आहे.