“कोणत्या माईच्या लालची हिंमत होती बोलायची? राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते” गुलाबराव पाटील यांची राज ठाकरेंवर घणाघाती टीका

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. शिवसेना (Shivsena) नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही सडकून टीका केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी मोजक्याच शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी पाहिला आहे. ज्या प्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. तसे राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत.

मनसे स्थापन करताना उत्तर प्रदेशातील लोकांना ठोकलं. पक्ष स्थापन झाल्यावर हम सब भाई आहे. आता काहीच हातात लागत नाही म्हणून हिंदुत्वाकडे टर्न केला. नंतर त्यांना चमत्कार झाला. मोदींकडे गुजरातला गेले.

आता मोदींवर टीका केली बारामतीत गेले, शरद पवारांची मुलाखत घेतली. आता शरद पवार वाईट झाले. हा सिझनेबल कार्यक्रम आहे, कोणत्याच ऋतूत काहीच मिळत नाही.

पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही, मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. म्हणून ही धडपड आहे अशी सडकून टीका गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

राज ठाकरेंना मी लहानपणापासून ओळखतो. हाफ चड्डीपासून मी शिवसैनिक आहे. तेव्हा पासून ते आमच्या जिल्ह्यात यायचे. चंचल माणूस आहे, चंचल स्वभावामुळे या गोष्टी होत असतात अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.

हनुमान चालिसा लावायला कोणाची मनाई आहे? भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप बाळासाहेब ठाकरे होते. त्या काळात कोणत्या माईच्या लालची हिंमत होती बोलायची? तेव्हा आमचा एकच बाप बोलायचा.

पहिला पिक्चर काढला आता हा पिक्चर टू आहे. बोलणं सोप्पं आहे. करणं कठीण आहे. मला बोलायला लावू नका, त्यांना जितकी मी ओळखतो तितकं तुम्ही ओळखत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या समोर हनुमान चालिसा लावू असेही पाटील म्हणाले.