मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रॉपर्टी ईडीने (ED) जप्त केल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचे सांगत भाजपला (Bjp) थेट इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, कोणती प्रॉपर्टी? २००९ साली आमच्या कष्टातून घेतलेली जागा आणि घर आहे ते. याबाबत कधी कुणी आमची चौकशी केली नाही. विचारणा केली नाही.

माझी मालमत्ता जप्त केल्याचं आता मी टीव्हीला पाहिलं. एक रुपया जरी मनी लॉन्ड्रिंगचा (Money laundering) आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
तसेच २००९ म्हणजे किती वर्ष झालं? अलिबागची ती जागा एक एकरही नाही. माझ्या पत्नीच्या किंवा तिच्या नात्यातील लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या छोट्या छोट्या जागा आहेत.
त्यात ईडीला मनी लॉन्ड्रिंग दिसायला लागलं. राजकीय सूड आणि बदला घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊन कारवाया केल्या जातात हे पाहिलं. आमचं मुंबईतील (Mumbai) राहतं घर जप्त केलं.
भाजपचे लोक उड्या मारत आहेत. फटाके फोडत आहेत. मराठी माणसाचं हक्काचं घर जप्त केल्याबद्दल आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाई नंतर राऊत यांनी ही पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपला सुनावले आहे.