नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी राजकीय (Political) चक्र समजून सांगत मी सत्तेच्या वर्तुळात वाढलो आहे, पण मला सत्तेत स्वारस्य नाही असे सांगितले आहे.
माजी सनदी अधिकारी आणि काँग्रेसचे नेते के. राजू (K. Raju) यांच्या ‘द दलित युथ: द बॅटल्स फॉर रिअलायझिंग आंबेडकर्स’ या पुस्तकाचे राहुल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, देशाने माझ्यावर केवळ प्रेमच केलं नाही तर मला मारहाणही केली आहे. हे का होत आहे? असा विचार मी करतोय. देश मला काही तरी शिकवतोय हेच यातून मला उत्तर मिळालं आहे.
तू शिक आणि समजून घे असं मला देश म्हणतोय, असं सांगतानाच अनेक राजकारणी (politician) सत्तेच्या शोधात असतात. ते सातत्याने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.
सत्तेचा विचार करत असतात. मी सत्तेच्या वर्तुळात वाढलो. पण प्रामाणिकपणे सांगतो मला सत्तेत जराही स्वारस्य नाही. त्याऐवजी मी देश समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे राहुल गांधी बोलले आहेत.
तसेच यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी बसपाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांचाही समाचार घेतला आहे. ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी आम्ही मायावती यांना आघाडी करण्यासाठी मेसेज (Sms) केला होता. पण त्यांनी मेसेजचा रिप्लाय दिला नाही.
लोकांनी घाम गाळून उत्तर प्रदेशात दलितांच्या वेदनेला वाचा फोडली, पण मायावती यांनी या लोकांसाठी लढण्यास नकार दिला, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
त्याचसोबत ईडी आणि सीबीआयच्या भीतीने मायावतीने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल यांचे म्हणणे आहे. व या कारणामुळेच कोणत्याही पूर्व तयारीशिवाय मायावती उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरल्या, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.