अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Krushi news :- कांद्याचे भाव कोसळ्याने अखेर ‘नाफेड’कडून (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd) कांदा खरेदी करण्यास सुरवात झाली आहे. यामुळे कांद्याचे घसरणारे दर सावरण्यास मदत होईल.
राज्य सरकारने २ लाख २० हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी १ लाख, सत्तर हजार टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्या तुलनेत ५० हजार टन कांदा जास्त खरेदी करण्यात येणार आहे.
सध्या प्रचलित बाजारभावा प्रमाणेच कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेण्यात आला आहे. कांदा खरेदीचा निर्णय झाल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना घसरलेले कांद्याचे दर सावरण्यासाठी नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीतर्फे करण्यात आली होती.
त्यानुसार १९ एप्रिलपासून महाराष्ट्रात नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू झाल्याचे स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी म्हटले आहे.