नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर खोचक शब्दात निशाणा साधला आहे.
कोल्हापूरमध्ये (Kolhapur) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संकल्प सभेत बोलताना शरद पवार यांनी तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली (Delhi) सांभाळता येत नाही, असे बोलत भाजपवर (Bjp) खोचक टीका केली आहे.
पवार म्हणाले, मागच्या काही दिवसात आपण पाहिले तर दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात हल्ले झाले, जाळपोळ झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असले तरी दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे.
अशावेळी तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची होती, पण त्यांनी ही काळजी घेतली नाही. दिल्लीत एखादी घटना घडली तरी त्याचा संदेश जगामध्ये जातो आणि या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही, असे पवार यावेळी बोलले आहेत.
तसेच हुबळीतील दंगलींवरुनही शरद पवारांनी बोलताना म्हटले, ‘दोन दिवसांपूर्वी मी कर्नाटकात होतो. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले की, हुबळीसारख्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. आज कर्नाटकमध्ये अल्पसंख्याक समाजाविरोधात जाहीर फलक लावले गेले आहेत.’
‘अमुक एका गावात अल्पसंख्याकांच्या दुकानात कुणी जाऊ नये, त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे जाहीर फलक लावले जात आहेत. हा संदेश देणारे लोक सत्ताधारी भाजपचे आहेत.
जिथे जिथे भाजपच्या हातात सत्ता आहे, तिथे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर आहे.’ असेही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.