एसपी कार्यालयातील ‘ती’ घटना; सायबर सेल चौकशीच्या फेर्‍यात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar News :- एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. सायबर पोलिसांनी फिर्याद न घेतल्याच्या रागातून तिने बुधवार, 20 एप्रिल रोजी हे कृत्य केले होते.

या घटनेची पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील हे या घटनेची चौकशी करणार आहेत.

दरम्यान सदरची महिला श्रीगोंदा तालुक्यातील असून तीने तिच्यावर झालेल्या अन्याय प्रकरणी सुरूवातीला बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. नंतर ती सायबर पोलीस ठाण्यात आली होती.

या संपूर्ण प्रकरणाची आता पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. बुधवार, 20 एप्रिल रोजी दुपारी सदर महिला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती.

तिचा फोटो एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याची तिची तक्रार होती. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी ती महिला आधी बेलवंडी पोलीस ठाण्यात गेली होती. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले.

त्यामुळे ती महिला सायबर पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, सायबर पोलिसांनी तुमची तक्रार आमच्या पोलीस ठाण्याअंतर्गत येत नाही,

असे सांगितल्याने चिडलेल्या महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तिच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe