अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- भोंग्यांवरून सध्या संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात भोंग्यांना परवानगीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात नव्याने आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधीक्षक पाटील म्हणाले,‘ध्वनीक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. ध्वनी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणीही केली जाते. कोणालाही ध्वनिक्षेपक लावायचे असल्यास परवानगी आवश्यकच आहे.

परवानगीसाठी अर्ज आल्यास स्थानिक अधिकारी तपासणी करून परवानगी देतील. त्याबाबत नव्याने आदेश देण्याची गरज नाही. परवानगीसाठी पोलीस प्रशासनाकडे अर्ज आल्यास स्थानिक अधिकारी तपासणी करून परवानगी देतील,
असे अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा पोलीस दलाकडून ध्वनिक्षेपकांची ध्वनी मर्यादा मोजण्यासंदर्भात गोपनीय शाखेच्या कर्मचार्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे विनापरवाना ध्वनिक्षेपकांबाबत पोलिसांकडून कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.