अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसरी सभा औरंगाबादमध्ये झाली. त्यावेळी त्यांनी राज्यभर सभा घेण्याची घोषणा केली.
त्या पाठोपाठ आता एमआयएमचे अध्यक्ष तसेच खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही राज्यभर सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे.

ज्या प्रमाणे राज ठाकरे यांनी सभा घेतल्या त्याच प्रमाणे आता आम्हीही औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, परळी यासह महाराष्ट्रभर सभा घेणार आहोत, असे ओवेसी यांनी नांदेडमध्ये जाहीर केले.
ते म्हणाले, ”भाजपनेच महाराष्ट्रात मुस्लिमांच्या विरोधात द्वेष सुरु केला. भाजपकडूनच आज सर्वात जास्त हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण सुरु आहे.
राज्यात जे काही चाललंय आम्ही पाहत आहोत. महाराष्ट्रात संविधानाच्या विरोधात बोलले जाते. राजकीय स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या भोंग्याविषयी राज ठाकरे जे बोलत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भावांचे भांडण आहे. देशात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी,समाजवादी पार्टी यांची स्वतःला हिंदुत्ववादी ठरवण्यासाठी चढाओढ सुरु आहे.
त्यात काँग्रेस व आप हे पक्ष काय दुधाने धुतलेले नाहीत. ज्या प्रमाणे देशात समान नागरी कायदा बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याच पद्धतीने देशात दारू बंदीदेखील व्हायला हवी, सगळ्यांचे उत्पन्न समान असायला हवं असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.