अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मात्र, रात्रीच पोलिसांसोबत मशिदीच्या मौलानांची बैठक झाली. त्यामध्ये सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे ठरेल.

त्यामुळे नगरमध्ये पहाटेची अजान भोंग्यांविनाच झाली. पहाटे साडेपाच वाजता ही अजान असते. सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत ध्वनिवर्धक लावण्यास मनाई आहे.
त्यामुळे या काळात भोंग्यांचा वापर न करता अजान देण्यात आली. आता पुढची अजान दुपारी भोंग्यावरून होणार. त्यानंतर सायंकाळी आणि रात्रीही नेहमीच्या वेळांप्रमाणे अजान होणार आहे.
मात्र, त्यासाठी घालून देण्यात आलेली आवाजाची मर्यादा पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे पोलिसांनी आंदोलनाच्या तयारी असलेल्या मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना नोटीसा दिल्या आहेत.
जिल्ह्यात सुमारे दीडशे जणांना नोटीसा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी शहरात बंदोबस्तही वाढविला आहे.