अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Ahmednagar News : राज्यात सध्या सुरू असलेल्या भोंग्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या मंदिरांवरील भोंगेही बंद करण्यात आले आहेत. या मुद्दयावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे, भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही.
मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्ष भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते.’ असे म्हणत राऊत यांनी याचे खापर ठाकरे यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांनी सर्वच धार्मिक स्थळांना सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करण्यासंबंधी पत्र पाठविले आहे. त्यानुसार शिर्डीतील साईबाबा संस्थाननेही मंदिरात पहाटे होणारी काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीच्यावेळी मंदिरावरील स्पीकर न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
आजपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. याशिवाय शहरातील इतर धार्मिकस्थळांनीही या सुप्रिम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिर्डीत पहाटे पाच वाजता भूपाळी होते. सव्वा पाच वाजता काकड आरती केली जाते. तर रात्री दहा वाजता शेजारती होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही ही परंपरा सुरूच होती. मात्र, आजपासून ती खंडित करण्यात आली आहे.