Ahmednagar Politics : कर्जत तालुक्यातील एकतरी अधिकारी हसताना दिसतो का? येथे एक नाही तर दहा आमदार असावेत एवढे पीए आणि यंत्रणा कार्यरत आहे. त्या माध्यमातून हे दबाव तंत्र सुरू आहे.
प्रत्येक अधिकाऱ्याच्या हाचलींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे सगळेच दबावाखाली आहेत. वेळ आल्यावर आपण त्यावर बोलू,’ असा आरोप नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

खासदार डॉ. विखे पाटील आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यात कामांचे श्रेय घेण्याचा वाद सध्या पेटला आहे. त्यातूनच एका कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी हा आरोप केला.
तालुक्यात दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप करून विखे पाटील म्हणाले, ‘कोणत्याही कार्यकर्त्याला कोणाचे नेतृत्व स्वीकारावे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये दबाव तंत्राने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडविला जाणे अयोग्य आहे. आपल्या जिल्ह्यात आता असे प्रकार घडू लागले आहेत. हे असेच सुरू राहिले तर येथील लोकशाही संपून जाईल.
येथील आमदार राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांनी मंजूर करून आणलेल्या मिरजगावमधील रस्त्याची काय अवस्था आहे, हेही त्यांनी पहावे. राष्ट्रीय महामार्ग आमच्यावर सोडा, तुम्ही आणलेल्या निधीतील रस्ता तरी पूर्ण करा,’ असा टोला विखे पाटील यांनी लगावला.