नाशिक, नगरला मिळणार अतिरिक्त पाणी, मराठवाड्याशी संघर्ष टळणार

Published on -

Ahmednagar News : नाशिकमधील उर्ध्व वैतरणा धरणातून सांडव्याद्वारे मुकणे धरणात तीन टीएमसी पाणी टनेलद्वारे वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा नेहमी संघर्ष होतो.

हा संघर्ष कमी करण्यासाठी वैतरणा नदीचे पाणी मुकणेत वळविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सद्यस्थितीत वैतरणा धरण पूर्ण पातळीपर्यंत भरल्यानंतर सांडव्यावरून वाहून जाणारे पुराचे पाणी वैतरणा नदीत पडून ते अरबी समुद्राला जाऊन मिळते.

या वाहून जाणाऱ्या पुराच्या पाण्याचा उपयोग नाशिक व नगर जिल्ह्यातील औद्योगिक, सिंचन आणि पिण्यासाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे वैतरणा कटक बंधाऱ्याशेजारी सांडवा बांधून अरबी समुद्रात वाहून जाणारे वैतरणाचे तीन टीएमसी पाणी मुकणेमध्ये वळण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नाशिक व नगरच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविता येणार आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागातील धरणांच्या पाण्यावरून मराठवाडा, नगर विरुद्ध नाशिक या जिल्ह्यांमध्ये होणारा संघर्ष जलसंपदा विभागाच्या नव्या प्रस्तावामुळे कमी होण्याची चिन्हे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News