Maharashtra news : जैन धर्मीयात १४.९ टक्के पुरुष व ४.३ टक्के महिला म्हणजे जवळपास २० टक्के समाज हा मांसाहारी असल्याचा अहवाल राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ च्या अहवालात दिला आहे.
त्यावरून जैन समाजात उद्रेक सुरू आहे. हा अहवाल अत्यंत खोटा आणि चुकीचा असल्याचे सांगत ऑल इंडिया जैन सोशल फोरम या राष्ट्रव्यापी संघटनेने या अहवालाचा जाहीर निषेध केला आहे.

ऑल इंडिया जय सोशल फोरमच्या वतीने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयालयाला यासंबंधी निवेदन पाठविण्यात आले आहे. या अहवालाच्या माध्यमातून जैन समाजाला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे ऑल इंडिया जैन सोशल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी म्हटले आहे
संपूर्ण देशात व विदेशात असलेल्या बांधवांची संख्या लाखोंच्या घरात आहे. असे असताना १६३२ महिला व २८० पुरुष यांना भेटून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या महिला व पुरुषांना अहवालातील कोण व कधी भेटले व यातील किमान शंभर लोकांची नावे तरी अहवाल बनवणार-यांनी जाहीर करण्याचे आवाहनही लुणिया यांनी केले आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह देशातील सर्व पक्षाच्या प्रमुख यांना पाठविण्यात आल्या आहेत.