Maharashtra news : शिवसेनेमुळे ताठर भूमिका घेतल्यामुळे कोंडी झालेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्यासाठी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राज्यभरातून मुंबईत दाखल झाले आहेत.
राज्यसभेवर संभाजीराजेंना बिनविरोध निवडून आणावे. जो कोणी पक्ष त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करील, त्या पक्षाला निवडणुकीत धडा शिकविला जाईल, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दहा जूनला राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. पक्षीय वाटपानंतर उरत असलेल्या यातील सहाव्या जागेवर दावा करून संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
मात्र, या जागेवर आता शिवसेनेनेही दावा केला आहे. छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केला, तरच त्यांना पाठिंबा देऊ, अन्यथा दुसरा उमेदवार दिला जाईल, असे शिवसेनेने जाहीर केले आहे.यामुळे संभाजीराजे यांची कोंडी झाली आहे.
अशा परिस्थितीत संभाजीराजे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचेच समन्वयक मुंबईत आले आहेत. छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढविणार आहेत.
त्यामुळे त्यांच्याकडे पक्षीय नजरेतून न पहाता सर्वपक्ष आणि अपक्ष आमदारांनी त्यांना साथ द्यावी. सर्वच पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहेत. असे असूनही संभाजीराजेंपुढे अडचणी का निर्माण केल्या जातात,
असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना नक्कीच साथ देईल, असा विश्वास व्यक्त करताना अपक्ष आमदारांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता संभाजीराजेंच्या पाठीशी रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.