मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमागे ईडी (ED) आणि आयकर विभागाचा (Income Tax) ससेमिरा चालू आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे.
अनिल परब यांच्या सरकारी आणि खाजगी निवासस्थानांसह एकूण 7 ठिकाणी ईडीने आज सकाळी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. अनिल परब हे उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात.
भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पुढील क्रमांक अनिल परब यांचा असेल, त्यांनी आपली बॅग तयार ठेवा, असे भाकित केले होते. म्हणजेच तपास यंत्रणांचे पुढचे लक्ष्य अनिल परब असतील, असे सोमय्या म्हणाले होते.
मुंबई पोलिसांचे निलंबित वादग्रस्त एपीआय सचिन वाझे यांच्या पोलिस खात्यातील बदल्यांबाबतच्या वक्तव्यानंतर हा छापा टाकण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. वाझे यांनी आपल्या निवेदनात मंत्री अनिल परब यांचे नाव घेतले होते.
परब यांचे नरिमन पॉइंट येथील शासकीय निवासस्थान, वांद्रे येथील खाजगी निवासस्थानासह पुणे, रत्नागिरी आदींसह सात ठिकाणी ईडीची कारवाई सुरू आहे.
अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे, आज शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेचे अर्ज भरणार असून आज ईडीने ही कारवाई केली आहे.
महाविकास आघाडीचे दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे यापूर्वीच तुरुंगात गेले आहेत, आता ईडीच्या या छाप्यात कोणते पुरावे हाती आले, यावरून अनिल परब यांचे भवितव्य ठरणार आहे. याप्रकरणी चौकशीसाठी ईडी लवकरच मंत्री अनिल परब यांना त्यांच्या कार्यालयात बोलावू शकते.