Maharashtra news : घोषणा केल्याप्रमाणे तोंडावरचा मास्क उतरवून सभा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मास्क वापरणे सुरूच ठेवले आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील नागरिकांनाही मास्कचा वापर थांबवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केले आहे. ठाकरे म्हणाले, ‘करोनारुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत आहे. राज्यातील नागरिकांनी मास्क वापरणे थांबवू नये. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली,

तरी करोना पूर्णपणे गेलेला नाही, हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे. चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून, ते वाढविण्यात यावे,’ असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या केवळ एक करोना रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, १८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
राज्याचे साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १.५९ टक्के आहे. मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या २१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ही संख्या २० च्या आत होती. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ लाख ३२ हजार चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे ३ लाख ९४ हजार लोकांना करोना झाला. ७२२५ जणांचा मृत्यू झाला. सुमारे ३ लाख ८७ हजार रुग्ण बरे झाले.