AhmednagarLive24 : अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे धाकटे बंधू सागर काळे यांचे काल (शुक्रवारी) रात्री दुःखद निधन झाले आहे.
काळे कुटुंबीयांवर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरामध्ये किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने कुस्ती स्पर्धा मागील दोन दिवसापासून सुरू असून त्याचे आज अंतिम सामने आणि बक्षीस वितरण समारंभ संध्याकाळी पार पडणार आहे.
त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडल्यामुळे किरण काळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सागर काळे हे उच्च शिक्षित होते. त्यांचं ग्रॅज्युएशन पुण्याच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयातून कृषी शाखेतून झालं होतं.
मनमिळावू स्वभावाच्या असणाऱ्या त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार चालू होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
आज शनिवारी दुपारी दोन वाजता अमरधाम येथे अंत्यविधी पार पडणार असल्याची माहिती काळे कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धांचा आज शेवटचा दिवस असून राज्यभरातून आलेल्या कुस्ती क्रीडापटूंची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजनाप्रमाणे स्पर्धा पार पडतील असे किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.