Maharashtra news : राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवणार हे भाकीत मी अनेक दिवसांपासून करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून माझे हे भाकीत खरे ठरताना दिसत आहे.
शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसनेच शिवसेनेचा केलेला गेम आहे, असा आरोप नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला.विखे पाटील शिर्डीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राष्ट्रवादीचे षडयंत्र ओळखावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ते म्हणाले, माझ्या आजोबांपासून शिवसेनेशी आमचे संबंध आहेत. त्यामुळे मला शिवसेनेबद्दल सहानुभूती आहे.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पासून सावध रहाण्याची गरज असून राष्ट्रवादी काँग्रेस हा खेळ करणारा पक्ष आहे. राज्यसभेच्या निकालाबद्दल अपक्षांना दोष देण्यापेक्षा शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे पहावे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीत सुखी आहेत. मात्र, सामान्य शिवसैनिकांसह आमदार खासदार दुःखी आहेत. येणाऱ्या विधान परिषदेतही शिवसेनेची नामुष्की होणार आहे. हे मुख्यमंत्र्यांनी वेळीच ओळखावे, असे विखे-पाटील म्हणाले.