Maharashtra news : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती मिळाली नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलने केली. उमेदवारी का नाकारली? अशी विचारणा केली जात होती. आता याला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
मात्र, त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून पंकजा यांना महाराष्ट्राऐवजी मध्य प्रदेशात सक्रीय करण्यावर पक्षाचा भर असल्याचे दिसून येत आहे.पंकजा यांना उमेदवारी का दिली नाही, याबद्दल फडणवीस म्हणाले, ‘पंकजा मुंडे भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत.
त्यांच्याकडे सध्या पक्षाची मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना सतत मध्यप्रदेशला जावे लागते. आता तेथेही निवडणुका आहेत. तेथील प्रचाराची जबाबदारीही मुंडे यांच्याकडे आहे. आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो.
मात्र, काळजी करु नका. भाजप एक परिवार आहे. आम्ही सगळे या परिवाराचे घटक आहोत असे,’ उत्तर फडणवीस यांनी दिले आहे.त्यामुळे मध्य प्रदेशची जबाबदारी असल्यानेच मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली नाही. भाजप त्यांच्याकडून महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशात जास्त सक्रीय राहण्याची अपक्षा करतो, हे स्पष्ट होत आहे.