Maharashtra news : मनधरणी करूनही आमदार ऐकत नाहीत, हे पाहून शिवसेनेने आता बंडखोर आमदारांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले आहे.
मुंबईतील वर्षा बंगल्यावर बुधवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उपस्थित राहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना आमदरांना देण्यात आल्या आहेत. राज्यात पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर आज सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्वांची उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.
या बैठकीला उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे, असे ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवेसनेच्या बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे. मात्र, याला बंडखोर आमदार घाबरण्याची सुतराम शक्यता नाही.