अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सुपा : महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी असून, सुसंस्कृत व रुढी परंपरेचे पालन करणारे राज़्य आहे, असे प्रतिापदन आ. नीलेश लंके यांनी केले. पारनेर तालुक्यातील रायतळे येथील सद्गुरू शांतानंद महाराज ट्रस्टतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळात आ. लंके बोलत होते.
या वेळी आ. लंके, धर्मादाय उपायुक्त हिराताई शेळके यांच्या हस्ते श्रीमती सविता पोपट साठे यांना आदर्शमाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुळात स्त्रीही सर्वार्थाने सबलाच आहे. निर्मितीचे सृजनाचे वरदान लाभलेली नारी ही नारायणी आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला विशेष स्थान आहे. उकडगाव येथील रहिवाशी असलेल्या पुरस्कार्थी श्रीमती सविता साठे सामान्य कुटुंबातल्या.
विवाहानंतर अल्प कालावधीत झालेल्या पतीच्या अकाली निधनाने खचून न जाता त्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवली. सध्या त्या दौंड (जि. पुणे) येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मुलाला इंजिनिअरिंगचे शिक्षण देऊन उद्योजक बनविले. माता व पिता या दोन्ही भूमिका त्यांनी जिद्दीने पार पाडल्या. त्यांच्या या कष्टाची दखल घेऊन शांतानंद महाराज ट्रस्टने त्यांना २०२० चा आदर्श माता पुरस्कार प्रदान केला.
कार्यक्रमात बोलताना आ. लंके म्हणाले, महाराष्ट्र हा साधुसंतांच्या विचारांचा, सुसंस्कृत व रुढी परंपरेचे पालन करणारे राज़्य आहे. आदर्श महिलांचा सत्कार करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याच्या ट्रस्टच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
उपायुक्त शेळके म्हणाल्या, या ट्रस्टचा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. काही माणसं काहीच करत नाहीत, पण बोलतात फार. काही खूप काम करतात, पण बोलत नाहीत . परंतू त्यांचे काम हे समाजोपयोगी असते. या ट्रस्टचे सामाजिक व धार्मिक कार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मी एका वारकरी घरातील मुलगी आहे. परस्त्रीला मातेसमान वागणूक द्या, मुलगा व मुलगी भेद करू नका, सुनेला मुलीप्रमाणे वागणूक द्या, हा खरा आपला धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.
स्त्री विषयीची समाजाची मानसिकता बदलायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ, साधक व महिला मोठया संखेने उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी ट्रस्टच्या साधकांनी परिश्रम घेतले. ट्रस्टचे अध्यक्ष संतसेवक महादेव महाराज काळे यांनी आभार मानले.