मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांमुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. संजय राऊतांमुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार सेनेतून बाहेर पडले. त्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, असे म्हणत शंभूराजे देसाईंनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली त्यामुळे त्यांना महत्त्व देत नाही. शरद पवार जे बोलतात ते कधीच खरं ठरत नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल असं सांगितलं होतं, पण अडीच वर्षात हे सरकार गेलं. आता शरद पवार म्हणत आहेत मध्यावधी लागणार, पण तसं होणार नाही, असेही शंभूराजे देसाई म्हणाले आहेत.
मैदान आता जास्त दूर नाही. अडीच वर्षानंतर निवडणुका होतील तेव्हा परिस्थिती समोर येईल. आमच्या नेत्याने एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही असा शब्द दिला असून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, असं शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे.