चाळीस रेडे काय करू शकतात याचे उत्तर मिळाले !

Published on -

Maharashtra news:महाविकास आघाडीशी अनैसर्गिक आघाडी झाली होती. ज्यांच्याविरोधात आम्ही मते मागितली होती त्यांच्यासोबत बसणे योग्य वाटत नव्हते. उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही बोललो, पण त्यांनी ऐकले नाही.

दोन-अडीच वर्षांत आमच्या आमदारांना व शिवसैनिकांना त्रास झाला. सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने आम्ही निर्णय घेतला. आगामी काळात पुढील अडीच वर्षे शिवसेना-भाजप आम्ही एकत्र राहणार असून सातारा जिल्ह्यातील चार आमदारांची संख्या नक्की वाढवून दाखवू.

चाळीस रेडे काय करू शकतात याचे उत्तर आणि प्रायश्चित्त त्यांना मिळाले आहे. त्यांच्या वक्तव्याला आम्ही फार महत्त्व देत नाही, अशा शब्दांत माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊतांची खिल्ली उडवली.

माजी मंत्री शंभूराज देसाई बुधवारी सातारा जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील शिवसेना व भाजपचे चारही आमदार व एक खासदार आम्ही एकत्र काम करणार आहोत.

मी कोणतेही मंत्रिपद मागितलेले नाही. मला मंत्री करणार की प्रमोशन देणार, पालकमंत्री करणार का, याविषयी काहीही बोललो नाही. माझा माझ्या नेत्यावर विश्वास आहे. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही मतदारसंघातील जनतेच्या मदतीसाठी दाखल झालो असून आता आम्ही कामाला लागलो आहोत.

गुवाहाटीला चाळीस रेडे पाठवलेत, असे संजय राऊत म्हणाले होते. यावर देसाई म्हणाले, हे चाळीस रेडे काय करू शकतात त्याचे प्रायश्चित्त त्यांना मिळाले आहे. मुळात त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देणे योग्य वाटत नाही.

‘धर्मवीर’ चित्रपट काढण्याचे अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या डोक्यात होते. मात्र, कोविडच्या अडचणींमुळे तो पुढे गेला. नारायण राणेंनी आमच्याबद्दल सद्‌भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News