Ahmednagar News : अहमदनगर येथील वेदांतनगरमध्ये प.पू. श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी स्थापन केलेल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. त्यामुळे आता गुरूपौर्णेमेचा उत्सव विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखालीच साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुण्यातील सहधर्मादाय आयुक्तांनी एका अर्जाच्या सुनावणीवेळी हा आदेश दिला होता. त्याविरोधात देवस्थानचे विश्वस्त सचिव संजय क्षीरसागर, मोहन शुक्ल, देवराज काशीकर, दिनेश पटवर्धन, राजन जोशी, तुषार कर्णिक, प्रदीप जोशी व पुरूषोत्तम कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

नगरच्या सहधर्मादाय आयुक्तांनी मंजूर केलेल्या बदल आर्जालाही स्थगिती देण्यात आली आहे. दत्त देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या वतीने अॅड.सुजीत जोशी, अॅड.शैलेश ब्रम्हे आणि अॅड.प्रशांत कातनेश्वरकर यांनी काम पाहिले.
त्यानुसार आता विश्वस्त मंडळ आणि सत्संग मंडळाकडून गुरूपौँर्णिमा उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. लाॅकडाऊननंतर तब्बल दोन वर्षांनी गुरूपौर्णिमा सोहळा खुल्या वातावरणात साजरा केला जाणार आहे.
महाराष्ट्रासह बाहेरूनही गुरूबंधू-भगिनी तसेच भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत म्हणून देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी करण्याची सेवा जोमात सुरू केली. देवस्थानचे व्यवस्थापक त्र्यंबक वैकर यांनी अहमदनगर येथील सत्संग मंडळ अध्यक्ष जयंत ठाणेकर, महिला अध्यक्षा मृदुला देशपांडे, इतर सर्व पदाधिकारी आणि सभासद यांच्यासह भाविकांच्या स्वागताची व सुविधेची व्यवस्था करण्यास सुरूवात केली आहे.