मुंबई : राज्यात शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला सत्तेपासून दूर व्हावे लागले आहे. राज्यातील सत्ता गमावल्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी शिवसेनेने हालचालींना सुरुवात केली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे आता विधान परिषदेत नवा विरोधी पक्षनेता नेमला जाणार आहे.
शिवसेना आमदारांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र सुपूर्द करण्यात आले आहे. यावेळी आमदार अंबादास दानवे, सचिन अहिर, मनिषा कायंदे, विलास पोतनीस, सुनील शिंदे आदी नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचा ठरावही उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
विधान परिषदेतील शिवसेना आमदारांची ९ जुलै रोजी ‘मातोश्री’वर बैठक पार पडली होती. या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता, गटनेता, प्रतोद नियुक्तीचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याक देण्याचा ठराव करण्यात आला होता.
महाविकास आघाडीत शिवसेनेकडे विधान परिषदेचे सर्वाधिक १३ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्यात आला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणात चांगलीच रंगत येणार आहे.