मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून आमदारांचे आभार मानले आणि कौतुकही केले. उध्दव ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून दिलेल्या कौतुकाच्या थापेमुळे आपणास शंभर हत्तीचं बळ मिळाले आहे, अशी भावना शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतंर्गत आमदारांनी एकापाठोपाठ एक बंड पुकारल्यानंतरसुध्दा स्थानिक आमदार डॉ. पाटील यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे शिवसेनेसह ठाकरे घराण्यावरील एकनिष्ठता दाखवून दिली आहे.

आपल्या पत्राने शंभर हत्तीचं बळ मिळालं आहे. शिवसेना आपला परिवार आहे. या परिवारास अघोरी दृष्ट लागली. आपण मुख्यमंत्रिपद स्वाभिमानाने सोडले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांची ढाल म्हणजेच शिवसेना आहे. आपल्या उमेदीच्या वयातच या विचाराने आम्ही तेजाळून गेलो आहोत. त्यामुळे आणखी कुठलीही अपेक्षा नाही. शिवसेनेची निष्ठा हेच आमचे सर्वस्व आहे. या लढाईत आपण स्वतः काळजी घ्यावी. परभणी जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ता आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे राहुल पाटील यांनी सांगितले आहे.