नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे २ दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.औरंगजेब तुमचा नातेवाईक झाला? नामांतराच्या स्थगितीवरुन राऊतांचा सवाल केला आहे.
ठाकरे सरकारनं खास करुन औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव केलं. नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. हे तिन्ही निर्णय फिरवले असतील आणि खरं असेल तर हे सरकार महाराष्ट्रद्रोही असेल, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

राजकीय, आर्थिक , बुलेट ट्रेन, आरेचा विषय हे आम्ही समजू शकतो, आम्ही संघर्ष करु पण औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला?, निजाम काळातील उस्मान तुमचा कोण लागतो, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिकेतून औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि दि.बा.पाटील यांचं नाव विमानतळाला दिलं होतं. या निर्णयांना स्थगिती का दिली हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवं कारण एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीच नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.