मुंबई : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेनंतर दीपक केसरकर चांगलेच दुखावले असल्याचे दिसले. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवारांविषयी आदर आहे. आपल्या तोंडून चुकूनही अपशब्द निघाला असल्यास त्यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन, असे दीपक केसरकरांनी स्पष्ट जाहीर केले आहे.

मी ज्यावेळी वेगवेगळ्या मुलाखती दिल्या होत्या. त्यावेळी पवारसाहेबांचा त्यात उल्लेख होता. त्यांच्याबद्दल मी कधीही अनुद्गार काढले नाहीत. माझ्या जीवनाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्याकडून कधीही अपशब्द येऊ शकत नाहीत, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.
शिवसेनेतील फुटीबाबत मी जे बोललो ती वस्तुस्थिती होती. २०१४ मध्ये आम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी जेव्हा सरकार स्थापन झाले. त्यावेळीही पवारांनी आपली भूमिका जाहीर केली होती की, भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती. या घटनांचा आणि त्यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करण्याचा काहीही संबंध नाही. माझ्या तोंडून त्यांच्याविषयी चुकून जरी अपशब्द निघाला असेल तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.