Ahmednagar News:मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अस्तित्वात आलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर पुन्हा टांगती तलावर निर्माण झाली आहे. राज्यातील नव्या सरकारकडून यामध्ये बदल केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावर आता भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला राजकीय मेळ आणि न्यायालयीन निर्देशांचे पालन करून हे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यास मोठा कालावधी लागला.
सप्टेंबर २०२१ मध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यातील आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती करण्यात आली. सोबत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कोट्यातील विश्वस्त नियुक्त करण्यात आले.
हे विश्वस्त मंडळही अपुऱ्या सदस्यांचे असल्याने प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले. मोठ्या प्रतीक्षेनंतर काही महिन्यांपूर्वीच कसाबसा मेळ घालत उरलेल्या विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली.
मुळात नियुक्तीच्या आधीपासूनच यासंबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने विश्वस्त मंडळाला मोठे धोरणात्मक निर्णय घ्यायला प्रतिबंध केला आहे.
घटनेनुसार सदस्यांची पात्रतेचा विचार केला नसल्याचा आरोप झाल्याने तेही प्रकरण प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत आता राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकारने जुन्या सरकारचे निर्णय बदलण्याचा सपाटा सुरू केला आहे.
त्यामुळे या सरकारकडून शिर्डीसह अन्य देवस्थान मंडळेही बदलली जाऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. शिर्डीच्या बाबतीत न्यायालयात झालेले आरोप आणि त्यावर वेळोवेळी दिलेले निर्देश यांचा आधार घेऊन बदल करण्यास वाव असल्याचे म्हटले जाते.