Ahmednagar News:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात नगर जिल्ह्यातील ९ लाख ३९ हजार ४८१ घरांवर तिरंगा झेंडा फडकाविण्याचे उद्दिष्ट आहे.
हा उपक्रम ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च समर्पण देणाऱ्या शहिदांच्या बलिदानचे स्मरण करीत या अभियानात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी केले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/07/orig_new-project-75_1657659117.jpg)
या उपक्रमात जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावागावातील, नागरीकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा, यासाठी सर्व जनतेचा सहभाग आवश्यक आहे. “हर घर तिरंगा” या उपक्रमासाठी शहरात महानगरपालिकेचे आयुक्त समन्वय अधिकारी असून तालुका पातळीवर गटविकास अधिकारी समन्वय अधिकारी आहेत.
या उपक्रमासाठी जिल्ह्यातील मोठ्या पुरवठादारांकडून आणि बचत गटाच्या माध्यमातुन तिरंगा ध्वज बनवून घेण्यात येणार असून शहरात व तालुक्यात, गावात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील ज्या संस्थांना, व्यक्तींना आपल्या मार्फत राष्ट्रीय ध्वज, डोनेट किंवा उपलब्ध करुन द्यायचा असेल त्यांनी तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयांशी, तसेच शहरासाठी महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यावेळी म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यामध्ये प्रशासनातर्फे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
“हर घर तिरंगा” हा उपक्रमांतर्गत ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान शासनाच्या नियमानुसार ध्वज आयताकार आकारात असावा तिरंगा ध्वज (झेंडा) फक्त कापडी असावा. जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि गावांतील प्रत्येक नागरीकांनी तिरंगा ध्वज विकत घेऊन आपल्या घरावर फडकावयाचा आहे.