मुंबई : शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर रामदास कदम यांनी आक्रमक होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
ज्या शिवसेनेसाठी आयुष्याची ५२ वर्षे मेहनत केली, त्याच शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली, असे म्हणत ढसाढसा रडणाऱ्या रामदास कदम यांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रामदास कदम आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळीकीवर बोट ठेवत आहेत. मात्र, विधानसभा निवडणूक हारल्यानंतर हेच रामदास कदम राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान साधू पाहत होते, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

‘रामदास कदम यांनी स्वत: च आत्मपरीक्षण केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून रामदास कदम अडीच वर्षांमध्ये एकदाही ‘मातोश्री’वर फिरकले नाहीत. त्या दिवसापासून रामदास कदम यांनी एक अवाक्षरही काढले नाही. पक्षात चुकीच्या गोष्टी सुरु असतील तर शिवसेनेचा नेता म्हणून त्यांनी बोलायला हवे होते. पण गेल्या अडीच वर्षांमध्ये ते एकदाही मातोश्रीवर आले नाहीत. ते इतक्या कुपमंडकू वृत्तीचे आहेत की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा अभिनंदन करण्यासाठीही रामदास कदम आले नव्हते. तेव्हा अडीच वर्षात त्यांनी मातोश्रीवर पाऊल का ठेवले नाही, हे त्यांना विचारा, असे अरविंद सावंत म्हणाले आहेत.