जिओची चलती, व्होडाफोन आयडियाला गळती, काय सांगतोय ‘ट्राय’ चा अहवाल?

Ahmednagarlive24 office
Published:

Mobile Networks:दूरसंचार क्षेत्रावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणाऱ्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात टीआरएआय ने कालच मे २०२२ मधील स्थितीचा अहवाल सादर केला आहे.

त्यावरून भारतातील मोबाईल सेवेचे चित्र समोर आले आहे.या अहवालानुसार रिलायन्स जिओने या महिन्यात ३१ लाख ११ हजारांहून अधिक ग्राहकांना आपल्या नेटवर्कमध्ये जोडले आहे. त्यामुळे रिलायन्स जिओ ४०.८७ दशलक्ष ग्राहकांसह दूरसंचार क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे.

तर देशातील दिग्गज कंपनी मानली जाणारी व्होडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआय ला मे महिन्यात पुन्हा एकदा मोठा तोटा सहन करावा लागला आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात ७ लाख ६० हजार ग्राहकांनी व्होडा-आयडियाचे नेटवर्क सोडले.

सुमारे २५.८४ दशलक्ष वापरकर्त्यांसह ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारती एअरटेल यूजर्सच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एअरटेलने मे महिन्यात जवळपास १० लाख २७ हजार युजर्स जोडले आहेत. मे महिन्यात एअरटेल वापरकर्त्यांची एकूण संख्या ३६.२१ दशलक्ष होती.

ट्रायच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात एकूण मोबाईल कनेक्शनमध्ये वाढ झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात सुमारे २८ लाख ४५ हजार नवीन कनेक्शन जोडण्यात आले आहेत. मे महिन्यात ग्रामीण भारतातील एकूण कनेक्शनची संख्या ५१.८८ दशलक्ष वरून ५२.०९ दशलक्ष झाली आहे. मे महिन्यात एकूण ७९ लाख ७० हजार ग्राहकांनी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी अर्ज केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe