मुंबई : शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये लोकसभेतील गटनेते पदावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांची लोकसभेच्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र ही नियुक्ती चुकीची आहे. शिवसेनेवर हा अन्याय आहे. हा नैसर्गिक न्याय नाही, असे सांगत शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवरच आरोप केला आहे.
शिवसेनेच्या बंडखोर गटाने १९ जुलैला त्यांचा गटनेते पदाबाबत मागणी केली, मात्र लोकसभा अध्यक्षांनी १८ जुलैलाच हा निर्णय घेतला. त्यामुळे बंडखोरांना निवडण्याचा निर्णय आधीच झाला होता,” असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. ‘लोकसभा अध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता, नैसर्गिक न्यायाचे तत्व न पाळता निर्णय घेतला’, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

“आम्ही ६ जुलैलाच लोकसभा अध्यक्ष आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना पत्र दिले होतं. त्यानंतर १८ जुलैला रात्री साडेआठ वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन शिवसेनेच्या गटनेतेपदावर कुणी दावा केल्यास आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची संधी द्या अशी मागणी केली. पुन्हा १९ जुलैला समक्ष भेटून लोकसभा अध्यक्षांना त्याबाबत पत्र दिलं. मात्र, त्यांनी आमच्या पत्रांची दखल न घेता अचानक लोकसभेतील शिवसेना गटनेते बदलले आहेत. राहुल शेवाळे यांचं नाव लोकसभा संकेतस्थळावर दाखवलं जात आहे, असेही विनायक राऊतांनी सांगितले आहे.
लोकसभा सचिवालयाचे हे कृत्य कोणत्या नियमाला धरून आहे याचे आम्हाला आकलन झालेले नाही. त्यांना कोणताही नैसर्गिक न्याय न देता, आमच्या पत्राची दखल न घेता बंडखोर गटाचा गटनेता बनवायचाच होता. त्यांनी किमान ज्या दिवशी बंडखोरांनी पत्र दिले त्या दिवसापासून तरी अंमलबजावणी करायला हवी होती. परंतु त्यांनी पत्र १९ जुलैला दिले आणि अंमलबजावणी १८ जुलैलाच केली. त्यामुळे पक्षपाती निर्णय झाल्याची शंका शिवसेना खासदारांमध्ये आहे, असेही विनायक राऊत म्हणाले आहेत.