Ahmednagar News:जिल्ह्यातील काही पदाधिकारी, नगरमधील नगरसेवक आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.
त्यांच्यावर जिल्हा प्रमुख म्हणून काय कारवाई करणार? यासंबंधी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ज्या लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्याचा सविस्तर अहवाल पक्षप्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहे.

त्यांच्यासंबंधी काय निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे. आणखी एक दोन दिवस वाट पाहून, जे गेल्याचे दिसून येत आहेत, त्यांना स्पष्टीकरण देण्याची संधी देऊन नंतरच अहवाल पाठविण्यात येणार आहे, असेही गाडे यांनी सांगितले.
दरम्यान, गाडे यांचा मुलगा नगरसेवक योगिराज गाडे हे इतर नगरसेवकांसोबत शिंदे गटात दाखल झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यासंबंधी गाडे आणि स्वत: नगरसेवक योगिराज गाडे यांनीही स्पष्टीकरण दिले आहे.
‘आपण शिंदे गटात प्रवेश केला नाही. खासगी कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी योगायोगाने इतर नगरसेवक तेथे आले आणि छायाचित्र घेतले गेले. आपण शिंदे यांना पाठिंबा दिलेला नाही, त्यासंबंधीच्या पत्रावर सहीही केलेली नाही.
शहरासाठी मागण्यांच्या एका निवेदनावर सही केली आहे. ते निवदेनही बंद खोलीत दिले. प्रवेश करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मंचावरही आपण गेलो नाहीत. शिंदे गटात प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही. आपण आजही आणि पुढेही ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे गाडे पिता-पुत्रांनी पत्रकारांना सांगितले.